मित्राविषयी.
तोंडावर गोड बोलणारा, व तुमच्या पाठीमागे तुमची निंदानालस्ती करणारा मित्र माणसाने कधीही जवळ करु नये. असा मित्र जवळ बाळगणे म्हणजे आपल्याच पायावर कु-हाड मारुन घेण्यासारखे आहे. असा मित्र प्रत्यक्ष शत्रूपेक्षाही धोकादायक समजावा.
मित्राची खरी परीक्षा होते संकटकाळी. आपल्या सुखात तो सहभागी होतो आणि आपल्या दु:खात तो आपले दु:ख सहन करायला मदत करतो. अशा मित्राशी मैत्री ठेवणे केंव्हाही चांगले. पण अशा मित्राजवळही आपली गुपिते सांगू नयेत. कारण तो जर शत्रू झाला तर आपली गुपिते उघड करण्याचा संभव असतो.
जो बुध्दिमान आहे, आदरणीय आहे, निर्भय आहे, विनयशील आहे आणि त्याग करायला मागे पुढे पहात नाही अशा माणसाशीच मैत्री करावी. असे गुण नसतील तर तो माणूस मैत्री करण्याच्या लायक नाही असे समजावे. अशी मैत्री फार काळ टिकत नाही.
समाजात ज्याला मान प्रतिष्ठा आहे अशा माणसाशीच मैत्री करावी. आपल्या दर्जाचा मित्र नसेल तर अशी मैत्री सुरळीतपणे जास्त दिवस टिकू शकत नाही. ती कधीतरी लवकर आणि एका क्षणात तुटते.
श्रीमंत माणसाला नको एवढे मित्र असतात. असे मित्र गोड गोड बोलून, खोटी स्तुती करुन आपला फायदा करून घेतात. त्या श्रीमंत माणसाला मात्र तो आपला गौरवच वाटतो. आपल्या भोवती जमलेले, आपण ज्यांना मित्र समजतो ते किती लबाड आहेत हे त्याला कळत नाही.
Previous Page- Chanakya Niti in Marathi - स्त्रीविषयी . (Page-03)
Comments
Post a Comment